एम्समध्ये लागण्यासाठी मंतरलेले पाणी शिंपडण्याचा मोटेगावकरांचा व्हिडिओ

Foto
छत्रपती संभाजीनगर : नीट पेपरफुटी प्रकरणात अटकेत असणारा आरसीसी शिकवणी वर्गाचा संचालक शिवराज मोटेगावकर वर्गातील विद्यार्थ्यांवर एम्स मध्ये प्रवेश मिळावा म्हणून तांब्याच्या भांड्यातून अंब्याच्या पानाने मंतरलेले पाणी विद्यार्थ्यांच्या अंगावर शिंपडत असल्याचे एका चलचित्रणात दिसून येत आहे. 

विज्ञान शिकविणार्‍या प्राध्यापकाकडून अंधश्रद्धा पसरवली जात असल्याचे दिसून आल्याने मोटेगावकराच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. मोटेगावकर त्याच्या शिकवणी वर्गात तुम्ही एम्समध्ये लागणार, असा दावा करत एका बाकावर चढून मुलांच्या डोक्यावर पाणी शिंपडत असल्याचे दिसून येत आहे. मोटेगावकर हेही मंत्रतंत्रावर विश्वास ठेवत होते का, असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणात मोटेगावकर याची भूमिका सीबीआयकडून त्याच्या विरोधातील पुरावे गोळा केले जात आहे. लातूरमधील काही डॉक्टर, पालक आणि विद्यार्थ्यांचीही चौकशी सुरू आहे. 

हजारो कोटी रुपयांची उलाढाल करणारा शिवराज मोटेगावकर हा डॉक्टरांच्या मुलांसाठी स्वतंत्र शिकवणी घेत असे. त्या तुकडीस ङ्गफोटॉनफ असे नाव देण्यात आले होते. डॉक्टर किती नामांकित यावरुन त्याचे शुल्क ठरत असे. उत्तम रसायनशास्त्र शिकवणार्‍या या व्यक्तीला वैज्ञानिक जाणीव नव्हतीच, हेही नव्या व्हिडिओमुळे समोर आले आहे.